सोलापूर : बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून निवडणूक लढविणार नाहीत, असा संदेश येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास घेतल्याचे चित्र बुधवारी काँग्रेस भवनमध्ये पाहावयास मिळाले.
जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार, अशा बातम्या आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला होता.
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी सोलापुरातील पार्क स्टेडियमवर घेतलेल्या बहुजन वंचित आघाडीच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यांनी जर सोलापुरातून निवडणूक लढविली तर मतांची मोठ्या प्रमाणावर फाटाफूट होणार असल्यामुळे माढ्यानंतर सोलापूर लोकसभेची चर्चा सुरू झाली होती. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून निवडणूक लढविणार नाहीत, असा बुधवारी काँग्रेस भवनमध्ये संदेश आल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला व पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आहे.
बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे आम्हाला कळाले असल्याची माहिती नगरसेवक चेतन नरोटे यांनी दिली.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह पदाधिकाºयांनी उत्तर तालुक्यातील गावांमध्ये गृहभेटीचा कार्यक्रम घेतला. इतर सर्व पदाधिकाºयांना विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे १८ मार्च रोजी सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर मतदान होईपर्यंत शिंदे सोलापुरात ठाण मांडून बसणार असल्याचे काँग्रेस भवनमधून सांगण्यात आले.