सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचे नामविस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्यासाठी तत्कालीन आमदार प्रकाश शेंडगे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. लक्षवेधीनंतर नामविस्ताराच्या चळवळीला सुरूवात झाली. दरम्यान, अनेक घटना, घडामोडींनंतर महाराष्ट्र शासनाने नामविस्ताराची घोषणा केली.
सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ आॅगस्ट २००४ मध्ये झाली. स्थापनेनंतर तत्कालीन आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोलापूर विद्यापीठाचे नामविस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्याची मागणी केली.
२००५-२००६ च्या अधिवेशनात आमदार प्रकाश शेंडगे यांनी लक्षवेधी मांडली होती. धनगर समाजातूनही ही मागणी मोठ्या प्रमाणात पुढे आली. नामविस्तारबाबत विद्यापीठाचा अभिप्राय कळविण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने कुलगुरू व प्रशासनाला देण्यात आले होते. यानंतर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज, बसवेश्वर महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी नावांच्या नामविस्तारचा विषय सिनेट सदस्यांच्या बैठकीत ठेवण्यात आला. तत्कालीन कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर व कुलसचिव शेजूळ यांच्या कार्यकालात समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, असा ठराव करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला.
२०१२ ते २०१६ दरम्यान तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.एन.मालदार, कुलसचिव एस.के. माळी यांच्या कालावधीत पुन्हा नामविस्ताराचा विषय पुढे आला. दरम्यान, ए.पी.जे. अब्दुल कलाम, शहीद भगतसिंग, चार हुतात्मा, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह ६० नावांची मागणी करण्यात आली. सिनेटच्या सभेत निकोप विकासाला चालना मिळावी, समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल करू नये, असा ठराव पुन्हा करण्यात आला. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटना, शिवा संघटनेने सिद्धेश्वर महाराज किंवा बसवेश्वर महाराज यांचे नाव देण्याचा आग्रह धरला. न्यायालयात याचिका दाखल केली़ त्यावर शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमली. शिक्षणमंत्री विनोद तावडे, मंत्री गिरीश बापट व अन्य एकाचा समावेश होता.
दुसरीकडे धनगर समाज रस्त्यावर उतरून नामांतरासाठी लढा देत होता. तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.एन.मालदार यांचा कार्यकाल संपल्यानंतर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर यांनी विद्यापीठाचा प्रभारी पदभार घेतला. सिनेटच्या सभेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामविस्तार करण्याचा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल शनिवारी शासनाकडे सुपूर्द करण्यात आला. मंगळवारी दुपारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नाव जाहीर करण्यात आले.