पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणीमातेच्या प्रक्षाळपुजे नंतर मंदिर समितीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांना विठ्ठल रुक्मिणी दर्शन बंदी केली होती. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी अन्यथा येत्या १ ऑगस्टपासून मंदिर समितीचे सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करतील असा इशारा विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचारी संघाच्यावतीने अध्यक्ष राजाभाऊ राऊत आणि सचिव विनोद पाटील यांच्याकडून देण्यात आलेला होता. मात्र मंदिर समिती सहअध्यक्षांबरोबर गुरुवारी दुरध्वनीवरुन झालेल्या चर्चेनंतर तुर्तास या आंदोलनाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती कर्मचारी संघाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.
दरम्यान, मंदिर समिती कर्मचारी संघाच्यावतीने प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे की, आषाढी यात्रा २०२० मध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा ९ जुलै २०२० रोजी रूढी व परंपरेनुसार संपन्न झाली. या पूजेच्या बाबतीत काही तक्रारी आल्यानंतर मंदिर समितीने सभा घेवून, मंदिराचे अधिकारी व कर्मचारी यांना बाजू मांडण्याची संधी न देता गाभारा बंदीची एकतर्फी कारवाई केली होती. ही केलेली कारवाई तात्काळ मागे घ्यावी अन्यथा येत्या १ ऑगस्टपासून मंदिर समितीकडील सर्व कर्मचारी सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करतील असा निर्णय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघ, पंढरपूर यांनी घेतला होता.
मात्र याबाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी दुरध्वनीद्वारे आज चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मंदिर समितीच्या ३० किंवा ३१ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत देण्यात देणार होती. तथापि पंढरपूर शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात येत्या १० ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन होणार असल्याने मंदिर समितीच्या सदस्यांना बैठकीसाठी येथे येणे शक्य नाही. तथापि मंदिर समितीची बैठक येत्या १० ऑगस्ट पूर्वी घेणे अशक्य आहे. त्यामुळे येत्या १५ आँगस्ट पूर्वी मंदिर समिती बैठक आयोजित करून त्या बैठकीत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल असे आश्वासन अध्यक्षांनी दिले आहे. तोपर्यंत आपले आंदोलन स्थगित करावे असे देखील त्यांनी सुचित केले आहे. त्यामुळे येत्या १ ऑगस्ट पासूनचे काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे. मात्र १५ ऑगस्ट पूर्वी मंदिर समितीची बैठक घेवून, अधिकारी व कर्मचारी यांना केलेली गाभारा बंदी मागे न घेतल्यास आम्हाला आंदोलन करण्याचा पर्याय खुला राहील असेही या पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.