आषाढी व कार्तिकी यात्रांच्यावेळी येथे लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात. प्रत्येक वारकऱ्याला विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी श्री विठूराय रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूप आरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेपूर्वीच देवाचा पलंगदेखील काढला जातो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन विठ्ठलालाही थकवा येतो अशी पूर्वापार प्रथा आहे. विठ्ठलाचा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर शुभ दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा होतो तो बुधवारी साजरा करण्यात आला.
-----
केशरयुक्त पाण्याने स्नान
बुधवारी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. त्या अगोदर श्री विठुरायाच्या मूर्तीच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्याला लिंबूसाखर लावण्यात आली. मंदिर समितीचे सदस्य डॉ. दिनेशकुमार कदम यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची पूजा करण्यात आली.
-----
पारंपरिक अलंकारांनी सजवले
देवाला सायंकाळी आकर्षक पोशाख परिधान करून पारंपरिक दुर्मिळ अलंकारांनी सजविण्यात आले. सायंकाळी नेहमीप्रमाणे धूपारती झाली. यात्रेमुळे काढलेला श्री विठ्ठलाचा पलंग शयनघरात पूर्ववत लावण्यात आला. रात्री विविध पदार्थांपासून बनविलेला आयुर्वेदिक काढादेखील दाखविण्यात आला. प्रक्षाळपूजेपासून मंदिरातील श्री विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू झाले.
----
या पदार्थांपासून बनतो काढा
विठ्ठलाचा थकवा दूर व्हावा यासाठी त्याला खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार तुळस, गवती चहा, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदाम बी, खारीक, वेलदोडा, सुंठ, बेदाणा, लवंग, हिरवा वेलदोडा, चारोळे अशा विविध पदार्थांपासून खास आयुर्वेदिक काढा बनविण्यात येत असतो, असे सांगण्यात आले.
-----
फोटो ओळी :
प्रक्षाळपूजेनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीला बुधवारी आकर्षक वस्त्रे परिधान करुन दुर्मिळ अलंकारांनी सजविण्यात आले.