सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज सोलापुरात आहेत. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत आ. प्रणिती शिंदे या आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. त्या म्हणाल्या की, उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे थांबवलेले काम टाईम बाउंड प्रोग्रॅम आखून तत्काळ पूर्ण करावे व सार्वजनिक नळ बंद करण्याची कारवाई थांबवावी अशी मागणी केली.
सोलापूर शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी समांतर जलवाहिनीची योजना कागदी घोडे चालवून विनाकारण प्रलंबित ठेवण्यात येत आहे. यामुळे शहरासाठी प्रामुख्याने महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प मागे पडत गेलेला आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून फक्त टेंडर प्रक्रिया व इतर गोष्टीची कारणे सांगून या प्रकल्पाचे काम थांबवलेले आहे. अशामुळे उजनी धरणामध्ये मुबलक पाणी असून देखील सोलापूरकरांना ५ ते ६ दिवसा आड पाणी मिळत आहे.
काही काळापूर्वी चालू झालेले काम कोणतेही वैद्य कारण नसताना स्मार्ट सिटी च्या तत्कालीन सीइओंनी थांबवले होते. समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करा व हे कारण काम पूर्ण होण्याकरिता कालमर्यादा निश्चित करून तसा कार्यक्रम आखण्यात यावा, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलत असताना सांगितले. समांतर जलवाहिनी योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी देता येईल. यामुळे या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकल्पावर काम करत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.
याचबरोबर, शहरातील सार्वजनिक नळ महानगरपालिकेकडून बंद करण्यात येत आहेत ही कारवाई थांबून प्रथमतः सामूहिक नळ कनेक्शन घेण्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती करावी व त्यांना प्रोत्साहित करावे याकरिता आपण घंटा गाड्यांवरील स्पीकर चा वापर ही करू शकतो त्यामुळे झोपडपट्टी भागांमध्ये चांगल्या रीतीने जनजागृती होईल व नागरिक सामूहिक नळ कनेक्शन घेण्याकरिता अर्ज करतील व त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊन जाईल. कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता थेट सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करणे म्हणजे गोरगरीब लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणे असे होत आहे, त्यामुळे प्रथमतः नागरिकांमध्ये जनजागृती करावी त्यांना सामूहिक नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. नंतर सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करावे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदेंनी केली आहे.