प्रणिती शिंदेंना आले मुंबईचे बोलावणं; मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:52 IST2019-12-27T12:44:43+5:302019-12-27T13:52:41+5:30
सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण; शेकडो कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीत

प्रणिती शिंदेंना आले मुंबईचे बोलावणं; मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता !
सोलापूर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश होणार या चर्चेने काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह पसरल्याचे दिसून येत आहे. तत्पुर्वी शुक्रवारी सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांना मुंबईतून बोलाविण्याने आल्याचे सांगण्यात आले़ प्रणिती शिंदे या सध्या सोलापुरात आहेत.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसभवनात काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रम आयोजनाबाबत बैठक झाली. या बैठकीत नगरसेवक चेतन नरोटे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असे वृत्त ‘लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आणले. त्यावर इतर कार्यकर्त्यानी याबाबत आनंद व्यक्त करून सर्वजण मुंबईला जाण्याची तयारी करुया अशी सूचना मांडली.
प्रकाश वाले यांनी आमदार शिंदे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून मंत्रिमंडळ समावेशाबद्दल सोलापुरात चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे काय ? अशी विचारणा केली. त्यावर आमदार शिंदे यांनी आम्हाला आज मुंबईला बोलावले आहे, थांबा वाट पहा, असा निरोप दिला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात घ्यावे अशी आग्रही मागणी शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केली.