सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक लढवित आहेत़ प्रणिती शिंदे विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी चर्चा झाली होती़ मात्र अर्ज माघार घेण्याच्या दिवशी बागवान यांनी अर्ज माघार घेतल्याने प्रणिती शिंदे यांना दिलासा मिळाला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल केली़ राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतानाही राष्ट्रवादीने जुबेर बागवान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले होते़ मात्र अर्ज माघार घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादीने अर्ज माघार घेतल्याने प्रणिती शिंदे यांना दिलासा मिळाला असून यामुळे प्रणिती शिंदे यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी होणारा संघर्ष टळला आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार म्हणाले की, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने उमेदवारी दिल्याने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनेही काँग्रेसच्या विरोधात उमेदवारी दिली होती़ मात्र वरिष्ठांनी पंढरपूरच्या त्या काँग्रेस उमेदवारावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले़ तत्पुर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या सुचनेनुसार आम्ही शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे दाखल केलेला जुबेर बागवान यांचा अर्ज माघार घेत असल्याचे सांगितले.