काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रणिती शिंदे यांची एंन्ट्री; सोलापूर लोकसभा उमेदवारीचे संकेत
By राकेश कदम | Published: August 20, 2023 03:47 PM2023-08-20T15:47:21+5:302023-08-20T15:48:01+5:30
ही नियुक्ती म्हणजे प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे संकेत असल्याचे मत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
सोलापूर - अखिल भारतीय काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती म्हणजे प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे संकेत असल्याचे मत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
आमदार प्रणिती शिंदे 2009 पासून सलग तीन वेळा शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत आहेत. काँग्रेसने रविवारी राष्ट्रीय कार्यकारी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून महाराष्ट्रातून माजी आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार प्रणिती शिंदे या महिला सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा यापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये दबदबा राहिला. देशातील अनेक राज्यातील सरकार स्थापनेची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आलेली होती. आता त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचाही समावेश झाला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी द्यावी असा ठराव पदाधिकाऱ्यांनी केला होता. आता प्रणिती शिंदे यांचा राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये समावेश झाला. ही निवड म्हणजे प्रणिती शिंदे यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उमेदवारीचे संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ग्रामीण आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.