विलास जळकोटकर, सोलापूर : जनतेमध्ये दहशत माजवून घरफोड्या, बाइक चोऱ्या, असे गंभीर गुन्हे करणाऱ्या प्रशांत यलप्पा शिवशरण (वय २७, रा. रूपाभवानी मंदिराजवळ, सोलापूर) याच्यावर एमपीडी अन्वये स्थानबद्ध कारवाई करण्यात आली. त्याची शनिवारी येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी हा आदेश बजावला.
यातील सराईत गुन्हेगार प्रशांत शिवरण याच्याविरोधात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून चोऱ्या, खंडणी उकळणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, अशा प्रकारचे १६ गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याला गुन्हेगारी कारवायांपासून रोखण्यासाठी सन २०२२ मध्ये तडीपारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे कार्य त्याने चालूच ठेवले.त्याच्या गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी ४ नोव्हेंबर रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, विजय कबाडे, सहा. पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, राजेंद्र करणकोट, फौजदार विशेंद्रसिंग बायस आदींनी केली.
...तरीही बदल झाला नाही
गुन्हेगारी कृत्यापासून प्रशांत शिवशरण याला परावृत्त करण्यासाठी २०२२ मध्ये क. ५६ (१)(अ)(ब) महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार प्रतिबंध (तडीपार) करण्यात आले होते. तरीही त्याच्या वर्तनात बदल झाला नसल्याने एमपीडीएची कारवाई करून त्याची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.