सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी नात्यातील एका शिक्षकाच्या सोयीसाठी परस्पर बदली केल्याबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील पाटील वस्तीशाळेवर नियुक्त असलेले उपशिक्षक एस. पी. चव्हाण यांची ३० जून रोजी मजरेवाडीतील लोकमान्यनगर शाळेवर बदली केली आहे. शासनाच्या नियमानुसार सध्या कोणत्याच शिक्षकाच्या सोयीने अंतर्गत बदल्या करता येत नाहीत, असे असताना जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहाचे प्रभारी अधीक्षक पद देण्यासाठी उपशिक्षक चव्हाण यांच्या बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अधिकार वापरण्यात आला आहे.
नेहरू वसतिगृहाचे अधीक्षक पद सन २००० पासून नियुक्त केलेले नाही. यासाठी स्वतंत्र पद निर्माण केल्यास अतिरिक्त भार पडणार आहे. जुलै २०१९ मध्ये शिक्षण समितीच्या मासिक सभेत यावर चर्चा झाली. शिक्षकाच्या पदस्थापनेत अंशता बदल करून एका शिक्षकावर अतिरिक्त काम देण्याचे ठरले. यानुसार चव्हाण यांची ही नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश सीईओ स्वामी यांनी जारी केला आहे.
तीन पदभार कसे सांभाळणार
उपशिक्षक चव्हाण यांनी लोकमान्य शाळेबरोबरच दोन्ही वसतिगृहांचे कामकाज पाहायचे आहे. नेहरू वसतिगृह शहरातील मोठे वसतिगृह आहे. काेरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी नाहीत. त्यामुळे कामकाज बंद आहे. आता शाळा सुरू झाल्यावर तीन कामकाज चव्हाण कसे सांभाळतील. गेल्या दहा वर्षांपासून ते याच पदावर आहेत. त्यांची सोय लावण्यासाठी ही बदली नियमबाह्य करण्यात आल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन नागटिळक यांनी व्यक्त केला आहे.
----------
सभेत लक्षवेधी करणार.....
आमच्या शाळांच्या सोयीसाठी एखाद्या शिक्षकाची बदली करा म्हटल्यावर शिक्षण विभाग नियम दाखविताे. पदाधिकाऱ्यांची शिफारस जुमानली जात नाही. मग चव्हाण यांच्यासाठी वेगळा नियम कशासाठी, असा सवाल त्रिभुवन धाईंजे यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी गौडगाव शाळेत नियुक्ती असताना एकदाही ते वर्गावर गेले नाहीत. मग आता नवीन ठिकाणचा वर्ग ते कसे सांभाळणार. वसतिगृह सांभाळण्यासाठी इतर कोणताच शिक्षक पात्र नाही काय, याबाबत सभेत लक्षवेधी केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
-----------------
पटसंख्येचा अहवाल बदलला
मजरेवाडीतील झेडपी शाळेत फक्त पन्नास विद्यार्थी आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. असे असताना चव्हाण यांची या शाळेत नियुक्ती कशी होऊ शकते, असा सवाल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी उपस्थित केला आहे. या शाळेत या आधी शिक्षकांनी बदली मागितल्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पटसंख्या कमी दाखविली. त्यानंतर चव्हाण यांच्या नियुक्तीसाठी महिन्यातच पटसंख्येचा अहवाल बदलल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
चव्हाण यांनी यापूर्वी नेहरू वसतिगृहाचे प्रभारी अधीक्षक म्हणून कामकाज चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार राहावा म्हणून प्रस्ताव दिला व तो सीईओंनी मंजूर केला आहे. ते माझे नातेवाईक नाहीत.
संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी