सांगोला शहर व तालुक्यात जानेवारी ते १५ मेपर्यंत प्रचंड उष्णतेमुळे सर्वांनाच हैराण करून सोडले होते. १५ मेनंतर वातावरणात बदल झाल्याने जोरदार वादळी वारे व अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. वातावरणातील बदलामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगोलावासीयांना थंड हवेचा दिलासा मिळू लागला आहे.
मागील दोन-चार दिवसांपासून सांगोला शहर व ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या भुवया उंचविल्या आहेत. मान्सूनपूर्व पाऊस खरीप पेरण्यासाठी शेतकऱ्यांना एक प्रकारे शुभसंदेश मानला जात आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी नांगरणी करून शेतीची मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे.
खते, बी-बियाणे वाटपाचे नियोजन
खरीप हंगामातील बाजरी, मका आदी खरीप पिकांचे क्षेत्र वाढल्याने सांगोला तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागामार्फत रासायनिक खते, बी-बियाणे वाटपाचे नियोजन केले आहे. वादळी वारे व मुसळधार अवकाळी पावसामुळे आंबा पिकासह डाळिंब, पपई, केळी, टोमॅटो, कारले, शिमला मिरचीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांमधून वर्तविला जात आहे.
मंडळनिहाय पाऊस
महूद २४ मि.मी., शिवणे ८४ मि.मी., संगेवाडी १५ मि.मी., सांगोला ७४ मि.मी., नाझरे ३५ मि.मी., जवळा २८ मि.मी., सोनंद ९ मि.मी., कोळा व हातीद दोन मंडळांमध्ये २ मि.मी. असा एकूण २७३ मि.मी., तर सरासरी ३०.३३ मि.मी. पाऊस झाला आहे.