सोलापूर : मागील दोन वर्षं कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे आता बदली प्रक्रियेकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. यासाठी पोर्टलवर नऊ हजार शिक्षकांची माहिती भरण्यात आली आहे. आजारी असलेल्या शिक्षकांना बदलीत प्राधान्य देण्यात येणार आहे.
कर्करोग, किडनीची समस्या, डायलेसिस करावी लागणारे शिक्षक, हृदय विकार असलेले शिक्षक यांना प्रथम संधी दिली जाते. आजारी असलेल्या शिक्षकांना घराजवळील शाळा मिळाल्यास त्यांची काळजी घेणे सोयीचे होते. यादृष्टीने बदली करण्याची तयारी केली जाते. राज्य सरकारमध्ये खातेवाटप झाले नाही. त्यातच सध्या शाळा सुरू झाल्या असून त्यात आता लगेच बदल करणे अवघड जाऊ शकते. जिल्ह्यात पाऊसही सारखा पडत असून यामुळे बदली प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सोपी, पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्यांना गती मिळेल. राज्यात सध्या दोन लाख प्राथमिक शिक्षक आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली.
-------
जिल्ह्यात नाहीत अवघड गावे
सोलापूर जिल्ह्यामध्ये सपाट क्षेत्र जास्त आहे. पूर येणे, पावसात डोंगर चढून शाळेत जाणे अशा अडचणी नाहीत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या बदलीसाठी अवघड गावांची यादी तयार करण्यात आली नाहीय. यापूर्वी माळशिरस तालुक्यातील गावांचा समावेश अवघड गावात करण्याची मागणी झाली होती, मात्र ती मान्य झाली नाही.
-----
रोस्टर पाठविणार
जिल्हा परिषद अंतर्गत शाळामध्ये अध्यापन करणाऱ्या ९ हजार ३५४ शिक्षकांची माहिती टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टिममध्ये भरण्यात आली आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध होते. पुढच्या टप्प्यात बिंदूनामावली (रोस्टर) पाठवण्यात येणार आहे. सगळ्याच शिक्षकांची माहीती पाठवण्यात आली असून बदलीची गरज असणारे यासाठी अर्ज करतील येते.
----------
चुकीची माहिती भरल्यास पाहता येईल
गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशासाठी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. या संगणकीय प्रणालीत चुकीची माहिती भरल्यास ती अन्य शिक्षकांना पाहता येईल, अशी सुविधा आहे. ही प्रणाली देशात फक्त महाराष्ट्रात आहे.
----------
आंतरजिल्हा बदलीसाठी..
या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्याची किमान पाच वर्षे सलग सेवा झालेली असणे गरजेचे आहे. लकवा, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रीकरण आदींचा विशेष संवर्ग शिक्षकांमध्ये समावेश करण्यात आला आहे
----------
जिल्हांतर्गत बदलीसाठी
जिल्हांतर्गत बदली करताना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण आणि सध्याच्या शाळेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी सहा टप्पे ठरविण्यात आले असून, कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या बदल्यांबाबत अनियमिततेची तक्रार आल्यास त्याचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.