सोलापूर जिल्ह्यात १० एप्रिलपासून अवकाळी पाऊस पडत आहे. मंगळवार, १३ एप्रिल रोजी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंबे गळून पडले, केळी, डाळिंब व द्राक्षाच्या बागा आडव्या झाल्याचे सांगण्यात आले.
उन्हाळी काढणी झालेला कांदा भिजल्याने सडून जाणार आहे. काढणी झालेली ज्वारी काळी पडणार आहे. जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळाने पिकांचे नुकसान झालेली आकडेवारी आणखीन वाढत असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
-----
कांदा पावसात भिजल्याने नुकसान
सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात ऊस वगळता अन्य पिकांची हानी झाली होती. बऱ्याच ठिकाणच्या शेतीत पाणी डिसेंबर- जानेवारी महिन्यापर्यंत होते. तीन- चार वर्षात पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक ठिकाणी जमिनीला चिबड लागली होती. अशा जमिनीतील ओल हटल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा, टरबूज, खरबूज, कलिंगडे, पपईसह अन्य पिके केली आहेत. मात्र चार दिवसाच्या पावसाने या पिकांची हानी झाली आहे. उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असून हा कांदा भिजल्याने नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
---
यंदाही आंब्याचे नुकसान
सोलापूर जिल्ह्यात सुशिक्षित तरुण शेतकरी नवनवीन पिकांचे प्रयोग करीत आहेत. उत्तर सोलापूर, माळशिरस व इतर तालुक्यात केशर आंब्याची शेती आहे. यावषी काढणीला आलेल्या आंब्याचे वादळाने नुकसान झाले आहे शिवाय गुरुवारपासून लाॅकडाऊन लागणार असल्याने आंबा विक्रीसाठी गैरसोय होणार आहे.
द्राक्ष, डाळिंबाचे मोठे नुकसान
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात द्राक्ष व डाळिंबाचे मोठे नुकसान झाले असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
द्राक्ष- ५२६ हेक्टर, डाळिंब - ५१८ हेक्टर, केळी- ३२१ हेक्टर, ज्वारी-५५ हेक्टर, आंबा- ३० हेक्टर व इतर पिके.
---
मोहोळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस
अवकाळी पाऊस सर्वाधिक मोहोळ तालुक्यात ४५.२ मि. मी. एवढा पाऊस झाला. तसेच उत्तर तालुका- ३३.८,
दक्षिण तालुका- २०.१, बार्शी- १५.९, अक्कलकोट- १७.८, माढा- २१.९, करमाळा- ९.१, पंढरपूर २१.६, सांगोला-६.८, माळशिरस- १२.४, मंगळवेढा- ११.१, असा सरासरी -१८.९ इतका पाऊस झाला.
----