सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणाला कोणतीही बाधा येणार नाही, अशा पद्धतीने होम मैदानावर स्टॉलची उभारणी करण्यात येईल. पण हे स्टॉल दुसºया कोणत्याही मैदानावर जाणार नाहीत, असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांनी सांगितले.
ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या यात्रा नियोजनाच्या तयारीसाठी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात बैठक घेतली. महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक अभियंता युसूफ मुजावर, देवस्थान समितीचे बाळासाहेब भोगडे, चिदानंद वनारोटे, विश्वनाथ लब्बा, बसवराज अष्टगी, शिवकुमार पाटील, काशिनाथ दर्गोपाटील यांच्यासह पोलीस, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
होम मैदानावर यंदा केवळ धार्मिक विधींना परवानगी मिळणार असल्याची चर्चा आहे. या मुद्याच्या आधारे बैठकीला सुरुवात झाली. होम मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. मैदान हस्तांतरण नियमानुसार होईल. मात्र स्टॉलची उभारणी आणि नियम याबाबतचे धोरण अद्याप ठरलेले नाही, असे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सांगितले. देवस्थान समितीच्या सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. यावर्षी आम्हाला मैदानाचा काही भाग मिळणार नाही. परंतु, धार्मिक विधींसह मनोरंजन, खाद्यपदार्थांचे स्टॉल मैदानावरच उभे राहतील. आम्ही इतरत्र जाणार नाही.
तलावाचे कठडे दुरुस्त करून घ्या- मैदानातील धुळीबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कारंजे म्हणाले, मैदानावर यंदा स्प्रिंकलर्स असतील. कंपाउंडच्या बाजूला रोपे लावण्यात आली आहेत. सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी धुळीचे प्रमाण कमी असेल, असेही त्यांनी सांगितले. सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलावात पाणी नाही. पण तलावाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तिथे किमान बॅरिकेड्स लावा किंवा दुरुस्तीची कामे करून घ्या, असे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी देवस्थान समितीच्या सदस्यांना सांगितले.
वाहतूक आराखडा नव्याने करा- होम मैदानाचा बराच भाग यंदा बंदिस्त आहे. स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने एक रस्ता बंद आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने आराखडा तयार करावा. देवस्थान समितीने यात्रा कालावधीत आवश्यक त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. लावावेत. पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, याबरोबरच आरोग्य विभागाने आपले पथक कार्यरत ठेवावे, असेही जगताप यांनी सांगितले. खाद्यपदार्थांचे स्टॉल लावताना ठराविक अंतर ठेवून लावण्यात यावेत, अशी सूचना आरोग्य अधिकाºयांनी केली. या कामांचा आढावा घेण्यासाठी आठ दिवसांनंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल.