सोलापूर : ओमायक्रॉनचे रुग्ण लातूरपाठोपाठ उस्मानाबादेतही सापडल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रशासन सज्ज झाले असून, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) ३०० आयसीयू बेड तयार ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
लातूरनंतर उस्मानाबादेत बुधवारी (दि. १५) दोन रुग्ण आढळले. त्यामुळे आता ओमायक्रॉनचा आपल्या जिल्ह्यात शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. लागणारी औषधे, लसींचा पुरवठा व्हावा म्हणून बैठक घेण्यात आली. यामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी, लसींचे दोन डोस घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात साडेसहा लाख लोकांनी लस घेतली आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावावेत, हात धुवावेत, मास्क वापरावेत, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
------------------
ओमायक्रॉनची शक्यता गृहीत धरून उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाने तयारी केली आहे. ग्रामीण भागात नऊ ठिकाणी ऑक्सिजन टँक उभे केले असून, दोन ठिकाणी हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. लसीचे दोन्ही डोस घेऊन शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी.
- डॉ. प्रदीप ढेले] जिल्हा शल्य चिकित्सक
------
सध्या रोज केल्या जाणाऱ्या चाचण्या
- शहर - ७४२
- ग्रामीण- ९५२
- कोरोनाची आजपर्यंतची स्थिती
- बाधित रुग्ण- ९९,६९२
- सक्रिय रुग्ण- ९६
- बरे झालेले - ९६,९२०
- मृत्यू - २७४५
----------
घाबरू नका; प्रतिबंधात्मक नियम पाळा..
ओमायक्रॉन हा विषाणू नवा असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासकीय नियमावलीचे पालन केल्यास या विषाणूपासून दूर राहता येते, अशा सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी दोन्ही डोस प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, सातत्याने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
----------
ग्रामीण भागात नऊ ठिकाणी ऑक्सिजन टँक
तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाने तयारी केली आहे. ग्रामीण भागात नऊ ठिकाणी ऑक्सिजन टँक उभे केले असून, दोन ठिकाणी हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.
----------
उपलब्ध औषधे
- रेमडेसिविर - ९६९
- फॅविपीरावीर - ५६,२०८
- इन्ट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन- १५७