आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सध्या पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, चैत्री यात्रेला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, १५ ते २१ एप्रिल २०२४ या कालावधीत पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
दरम्यान, चैत्री शुध्द एकादशी १९ एप्रिल २०२४ रोजी साजरी होणार आहे. त्यादृष्टीने मंदिर समिती, पोलिस व अन्य प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. यात्रेसाठी येणा-या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध ठेवावी अशा सूचना प्राताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
तसेच कायमस्वरूपी ४ पत्राशेड व तात्पुरते ४ असे एकूण ८ पत्राशेड उभारण्यात येत आहेत. दर्शनरांगेत मॅट टाकणे, बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत त्याचबरोबर दर्शनरांगेत दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी भाविकांना मोफत लिंबू सरबत, मठ्ठा व खिचडी वाटप करण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीने सांगितले.