सोलापूर : शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी लेझीमचा सराव... सरावावेळी तरुणाईचा उत्साह अधिक द्विगुणित व्हावा, यासाठी दिवसा सूर्यकिरणांनी चॉर्जिंग झालेले बल्व लेझीमच्या दोन्ही दांड्यात बसवून चाललेल्या सरावात तरुणाई उजळून निघत आहे. शाहीर वस्ती येथील जागृती शिवजन्मोत्सव मंडळाचा हा सराव पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे.
मंडळाचे ५०० ते ६०० कार्यकर्ते या अनोख्या लेझीमसह जोशपूर्ण विविध डाव, पैतरे सादर करणार आहेत. अशाप्रकारे एलईडी लेझीम सादर करणारे जागृती मंडळ हे सोलापुरातील पाहिले मंडळ होय. नवनवीन उपक्रम करण्यात अग्रेसर असलेल्या जागृती मंडळाचे कार्यकर्ते सुजित पवार यांना ही कल्पना सुचली.
घरातील देवीच्या, महाराजांच्या फोटोला एलईडी लायटिंग आहे तर लेझीमला का होऊ शकत नाही, असा विचार करीत, सोलर पॅनलसह लहान बॅटरी संच बसवून लेझीमला प्रकाशमय केले. दिवसभर उन्हात हे सर्व लेझीम चार्ज केले जातात आणि रात्री सरावासाठी काढले जातात. रूपभवानी मंदिराकडून सम्राट चौकाकडे जाताना वर्धमान नगर येथे दररोज जागृती मंडळाचे कार्यकर्ते या लेझीमसह सराव करताना दिसून येतात.
रात्री सादर होणारे लेझीमचे डाव, पैतरे रात्रीच्या अंधारात जणू काजव्यांचे चमकदार नृत्य सादर होत असल्याचा भास होतो. दिमाखदार सोहळा साजरा करण्यासाठी यंदा जागृती मंडळाने शंभर महिलांच्या पारंपरिक वेशभूषेसह महाराष्ट्रातील पंधरा पुरोहितांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चार करीत महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती साकारणारे एकमेव मंडळ आहे. सामाजिक कार्याचा वसा या मंडळाने घेतला आहे.
वेगळा उपक्रम राबवताय ? पाठवा मेसेज..उत्सवप्रिय सोलापूर जिल्ह्यात शिवजन्मोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरु झालीय. अनेक मंडळे, सामाजिक संस्थांकडून शिवरायांच्या विचाराचा वारसा जपण्यासाठी अनेक विधायक उपक्रम हाती घेतलीत. या सर्व चांगल्या उपक्रमांना ‘लोकमत’ने ठळक प्रसिद्धी देण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. चला तर मग.. उचला मोबाईल अन् पाठवा माहिती.. 9922427776 व्हॉट्सअॅप क्रमांकावर
जागृती मंडळाचे सहाशेपेक्षा अधिक कार्यकर्ते असून, चारशे एलईडीसह लेझीम तयार झाले आहेत, दोनशे तयार होत आहेत. मिरवणुकीत रात्रीच्या अंधारात लेझीमसह प्रकाशाची झळाळी दिसावी, कार्यकर्त्यांना जोश येण्यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे.- संजय कोळी, जागृती मंडळ