प्रदीप पाटील
भीमानगर : माढा तालुक्यातील भीमानगर येथे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात येत असून, मंडळाच्या बैठकीमध्ये पहिल्यांदाच पालखीमधून शिवरायांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सुरुवातीपासून भीमानगरमध्ये ‘एक गाव, एक जयंती’ उपक्रम राबविण्यात येत आहे. कोणाचीही अध्यक्षपदी निवड न करता सर्व जण एकत्र येऊन ही शिवजयंती साजरी करतात.
सकाळी पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते व दिवसभर पोवाडे गायले जातात. सायंकाळी पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. चालू वर्षी कामधेनू परिवाराचे संस्थापक डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान होणार आहे. २५ हलग्या, दांडपट्टा, मराठमोळा कार्यक्रम, मर्दानी खेळ, लेझीम खेळ व उजेडासाठी टेंबे यांच्या माध्यमातून मिरवणूक पार पाडली जाणार आहे.
पारंपरिक पद्धतीवर भरभीमानगर गावाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे शिवजयंतीदिवशी प्रत्येकाच्या घरावर भगवा झेंडा फडकवला जातो. घरासमोर रांगोळी काढली जाते. मोटरसायकली चारचाकी गाड्यांना स्टिकर लावून शिवमय वातावरण निर्मिती केली जाते.
प्रत्येकाच्या कपाळी चंद्राची कोर लावली जाते. सायंकाळी शाही पालखी सोहळा आयोजित केला आहे. अशाप्रकारे भीमानगरमध्ये शिवजयंती पारंपरिक पद्धतीने हा उत्सव पार पाडला जातो.