कुर्डूवाडी
: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीच्या नियोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी शुक्रवारी सकाळी माढा व कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाचा दौरा केला. या दौऱ्यात तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून ऑक्सिजन प्लांट उभारणे, ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड म्हणून निर्माण करणे, कोविड बालरुग्णालय बेड निर्माण करणे याबाबत आढावा घेतला. आवश्यक्ता निर्माण झाल्यास जिल्हास्तरीय यंत्रणेवरून लागेल ती मदत पुरवली जाईल अशा सूचना डॉ. ढेले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
माढा येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस करून त्यांना दिलेल्या उपचाराबाबत आढावाही घेतला. डॉ. ढेले सकाळी माढ्यात दाखल झाले. यावेळी भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेबाबत चर्चा करून कुर्डूवाडीतील ग्रामीण रुग्णालयाला डेडीकेटेड हॉस्पिटल करण्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. तेथील आढावा घेऊन त्यांनी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांची भेट घेऊन कोरोनाबाबत चर्चा केली. भविष्यातल्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा केली.
यावेळी भेटीदरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, डॉ सदानंद व्हनकळस, डॉ सुनंदा गायकवाड, डॉ.क्षीरसागर, डॉ. बाबर, डॉ.भंडारी, डॉ.तोडेकर, डॉ प्रसन्न शहा, डॉ सातव उपस्थित होते.
.............
ऑक्सिजन प्लांट उभारणार
माढा ग्रामीण रुग्णालयात भविष्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या अडचणी पाहून पीएसए ऑक्सिजन प्लांटची सोय कशा प्रकारे करण्यात येईल यावर चर्चा केली. यासंदर्भात जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद व्हनकळस यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
---
फोटो : २१ कुर्डूवाडी
माढा येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या डेडीकेटेड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना ट्रीटमेंटबाबत विचारताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले,यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद व्हनकळस.