सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ठरल्याप्रमाणे मार्चअखेर सादर करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन दरवर्षी मार्चअखेर अंदाजपत्रक सादर करीत असते. पण यंदा लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागण्याअगोदर अंदाजपत्रकीय सभा घ्या, असा आग्रह सदस्यांनी केला आहे. त्यामुळे अंदाजपत्रकीय सभा घेण्याबाबत झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
शिंदे यांनी प्रशासनाने तयारी करून नेहमीच्या पद्धतीने अंदाजपत्रक सादर करण्यास संमती दिली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सर्व विभागाचा खर्चाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चाची आकडेवारी संकलित करून नवीन आर्थिक वर्षात कोणत्या नवीन योजना घ्याव्यात त्याबाबत तरतुदी सुचविण्यात येणार आहेत.
गतवर्षी झेडपीचे सुमारे ४५ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यानंतर पुरवणीत सुमारे २० कोटींची वाढ करण्यात आली. यंदाही विविध योजनांसाठी वाढीव निधी मागण्यात आला आहे. त्यामुळे अंदाजपत्रक वाढणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ठरल्याप्रमाणे मार्चअखेर अंदाजपत्रक सादर करण्यात येणार असल्याने सर्व विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे. शासनाने विविध योजनांपोटी दिलेला निधी मार्चअखेर खर्ची टाकण्यास बंदी घातली आहे.
जानेवारीनंतर कोणत्याही नवीन कामांचे टेंडर काढता येणार नाही, अशी राज्य शासनाकडून अट घालण्यात आल्याने काही योजनांचा निधी आता खर्चाअभावी शिल्लक राहणार आहे. जिल्हा नियोजनकडून मिळणारा निधी जवळजवळ ८० टक्क्यांवर खर्ची घालण्यात आला आहे. हा निधी जवळपास २५0 कोटींपर्यंत आहे. पण इतर योजनांचा निधी ६0 टक्क्यांवर खर्ची पडला आहे. त्यामुळे यातील काही रक्कम परत जाईल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
झेडपीच्या अंदाजपत्रकाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाच्या नियोजनाप्रमाणे अंदाजपत्रक सादर करावे अशा सूचना दिल्या आहेत. -संजय शिंदे, अध्यक्ष, झेडपी