कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील भुताष्टे येथे सलगर वस्तीवरील लिंबाजी सलगर यांचे पुत्र परमेश्वर व नवनाथ यांचा विवाह पिंपरी बु (ता.इंदापूर) येथील नानासाहेब शिंगटे यांच्या कन्या सारीका व सुगंधा यांचेशी मंगळवार दि.३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वा. होणार होता. परंतु संबंधित दोन्ही वधू या अल्पवयीन असल्याची निनावी तक्रार माढा तहसीलदारांकडे आल्याने त्यांनी लागलीच बालविकास प्रकल्प अधिकारी व पोलिस निरीक्षकांना बालविवाह रोखण्याचे आदेश दिले. त्यानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे व सहायक फौजदार एन एन लोंढे यांच्या पथकाने दोन्ही वधु वरांसह त्यांच्या आई वडिलांचे जबाब घेऊन होणारा बाल विवाह रोखण्याचे काम केले आहे.
याबाबत माहिती अशी की,भुताष्टे येथील सलगर व पिंपरी येथील शिंगटे यांचा विवाह ३ डिसेंबर रोजी करण्याचे नियोजित योजिले होते. लग्नासाठी लागणारे कापड खरेदी, पत्रिका वाटप व मंडपासह सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु ३० नोव्हेंबर रोजी माढा तहसीलदारांकडे या लग्नातील दोन्ही वधू या अल्पवयीन असल्याची निनावी लेखी तक्रार प्राप्त झाली, त्यानुसार तहसीलदारांनी बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे व सहायक फौजदार एन एन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले. त्यानुसार या पथकाने २ डिसेंबर रोजी हळदी दिवशी विवाहस्थळी जाऊन आई वडिलांना एकत्र बोलवून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले व विवाह न करण्याचे आदेश दिले.
मंगळवारी पुन्हा हे पथक विवाहस्थळी तळ ठोकून थांबून राहिले. त्यामुळे संबंधित सलगर व शिंगटे परिवाराने विवाह रद्द करून होणारा बालविवाह थांबवला. यावेळी वधु वरांसह त्यांच्या आई वडिलांनी कायद्याप्रमाणे लग्नायोग्य वय झाल्यानंतरच विवाह करण्याचे पथकाला लिहून दिले. या पथकामध्ये बालप्रकल्प अधिकारी विनोद लोंढे, पर्यवेक्षिका रूपाली ढवण, सहा.फौजदार एन.एन.लोंढे, पोलिस नाईक घोळवे, ग्रामसेवक दत्ता टोणपे आदी उपस्थित होते.