सोलापूर : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता घसरत चालली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देत आहेत. त्यासाठी शेतकरी मुख्यतः शेणखताचा वापर करत आहेत. मात्र, यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची पशुधनात होणारी घट यामुळे शेणखताला सध्या सोन्याचा भाव आला आहे. सोलापुरात एक ब्रास शेणखत तीन हजार रुपयांना विकले जात आहे.
यामुळे पूर्वी गावशिवारात सहज मिळणारे शेणखत आता अधिक दरात मिळत आहे. सोलापुरात मजरेवाडी येथील शेतकरी अमित लामखाने या शेतकऱ्याने आपल्या शेतात सेंद्रिय पिकांची लागवड केली असून, त्यांच्या घरी २० पाळीव म्हशी आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणाचा वापर शेणखत म्हणून करीत आहेत, तर राहिलेल्या शेणखताची विक्री सोलापूर, मोहोळ, बार्शी, माढा आणि करमाळा याठिकाणी करतात.
यांत्रिकीकरण, गाय, म्हैस, बैल, शेळ्या अशा पशुधनाच्या किमती वाढल्याचा फटकाही पशुपालनास बसला आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व चाराटंचाई यामुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरल्यामुळेही शेणखताची मागणी वाढली आहे. पूर्वी एक हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते, ते सध्या चार हजार ते पाच हजार ट्रॉलीप्रमाणे मिळत आहे.
असा होतो शेणखताचा फायदा....
गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. वापराने जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि विषमुक्त धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाहीत. शेणखतामुळे वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकांना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे पीक वाढीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.
माझ्याकडे २० म्हशी असून, त्यांच्या शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा यापासून जे खत तयार होते, ते आम्ही शेतात वापरतो, राहिलेले शेणखताची विक्री करतो, लॉकडाऊननंतर शेणखताची मागणी सोलापूर आणि परिसरातून वाढली आहे.
- अमित लामकाने, पशुपालक शेतकरी