सोलापूर : घरात साधा टीव्ही असताना लोकांना चोरीतील ५० हजार रुपयांपर्यंतचे एल.ई.डी. टीव्ही विकणाºया मार्डीच्या पुजाºयाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैभव नागनाथ गुरव (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव गुरव याचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले असून तो ड्रायव्हर आहे. दोन वर्षांपूर्वी तो पुणे येथे बहिणीच्या घरी राहण्यास गेला असून, तेथे त्याने भावजीच्या मदतीने कार घेतली होती. कार पुण्यात कॅबसाठी भाड्याने चालवत होता. ड्रायव्हिंगचा व्यवसाय करीत असताना तो अधूनमधून मार्डी या गावी येत होता. पुन्हा पुण्यात जात होता. काही साथीदारांच्या मदतीने तो सांगली व कोल्हापूर भागात रेकी करीत असे. रात्री-अपरात्री बंद घरे फोडून तो चोºया करीत होता. चोरीमध्ये मिळालेला एलईडी टीव्ही तो मार्डी येथील गावी वनविभागाच्या जागेत ठेवत असे.
आपल्याकडे टीव्ही असून तो विकायचा आहे असे ओळखीच्या लोकांना सांगत असे. ३० हजार, ४० हजार आणि ५० हजार रुपयांपर्यंतचा टीव्ही तो १० हजार, १५ हजार, २० हजार रुपयांपर्यंत विकत होता. वैभव गुरव हा गावातील पुजाºयाचा मुलगा असल्याने लोक त्याच्यावर विश्वास ठेवून टीव्ही घेत होते. वैभव गुरव विकत असलेले टीव्ही चोरीचे असल्याची माहिती पोलिसांना बातमीदारामार्फत मिळाली. माहितीवरून तालुका पोलिसांनी मार्डी येथे जाऊन चौकशी केली, त्यांना वनविभागाच्या जागेत पत्राशेडमध्ये ३२ ते ५४ इंची पर्यंतच्या एकूण सहा एलईडी आढळून आल्या. या टीव्ही वैभव गुरव याने ठेवल्याची माहिती मिळाली; मात्र तो मार्डी गावात नव्हता. पोलिसांनी त्याला पुणे येथील बहिणीच्या घरातून अटक केली असे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
सोलापुरात करीत नव्हता चोरी...- वैभवने दीड वर्षापासून घरफोडीला सुरुवात केली आहे. घरफोडीत वाटणीला आलेल्या एलईडी टीव्ही तो स्वत:कडे ठेवत होता. त्याने आत्तापर्यंत फक्त कोल्हापूर व सांगली भागातच घरफोड्या केल्या आहेत. सोलापुरात चोरी केली नसल्याचे सांगितले आहे.