सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार, १९ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कुंभारी येथील रे नगर प्रकल्पातील १५ हजार घरकुलांचे वाटप कार्यक्रम होणार आहे. राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वर मुख्य सचिव वलसा नायर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याविषयी भ्रमणध्वनीवर प्राथमिक माहिती दिल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.
कुंभारी येथील रे नगर प्रकल्पात एकूण ३० हजार घरकुलांचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते चावी वाटप कार्यक्रम होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विचारले असता त्यांनी देखील पंतप्रधानांचा दौरा १९ जानेवारीला होणार असल्याचे सांगितले. १९ जानेवारी दुपारी २ दरम्यान कुंभारी परिसरात पंतप्रधानांचा कार्यक्रम होणार आहे. वलसा नायर यांच्या फोननंतर दौऱ्याबाबत तयारीला लागल्याची माहिती आडम मास्तर यांनी दिली. १५ हजार घरकुलांचे वाटप, सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचे भूमिपूजन तसेच रे-नगर येथील पायाभूत सोयी-सुविधांचे उद्घाटन देखील होणार आहे.