माळीनगर : रविवार, दुपारी १२़४५ ची वेळ, स्क्रीनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीतून बुथप्रमुखांशी संवाद साधताना म्हणाले, नमस्कार! माढावाल्यांनो, कसं काय ठीक आहे ना! सर्वांचे उत्तर आले हो़़़, मग विचारा प्रश्न असे म्हणताच सदानंद ठेंगील (वरकुटे, ता़ माढा) यांनी प्रश्न विचारला, आपण खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, याचा लोकांना कसा लाभ होणार?
सदानंद ठेंगील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले, संविधानामध्ये संशोधन करूनच हे आरक्षण लागू केले आहे़ सामान्य वर्गातील गरिबांना शैक्षणिक संस्था व सरकारी सेवेत आरक्षणाची सोय केली आहे़ ही सोय भाजप सरकारने केल्यामुळे विरोधक हताश होऊन खोट्या गोष्टी पसरवत आहेत. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले; मात्र भाजपाने देशातील १२५ करोड लोकांना एकत्र केले आहे़ आम्ही देशवासीयांसाठी एकत्र आलो आहोत, कोलकाता येथे एकत्र आलेले विरोधक आपल्या वंशांना पुढे आणत आहेत़ तिकडे धनशक्ती आहे, भाजपाकडे जनशक्ती आहे़ विरोधक परिवार वाचवत आहे, आम्ही देशाला वाचवतो आहोत. महाराष्ट्राचा विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील एकही क्षेत्र सोडले नाही, जिथे भ्रष्टाचार केला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपाने २ लोकसभा सदस्यांवरून २८३ लोकसभा सदस्य संख्याबळ तयार केले आहे. महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये भाजपाला यश मिळाले आहे़ कार्यकर्त्यांच्या कठीण परिश्रमामुळेच अनेक ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी, महानगरपालिका, नगरपरिषद या ठिकाणी यश मिळवले असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले़ जवळपास ५ मिनिटे नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.
याप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माळशिरस तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, माढा तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, सांगोला तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पंचायत समिती सदस्य अजय सकट, भाजप युवा मोर्चाचे महेश इंगळे, के. के़ पाटील, सरपंच माऊली कांबळे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा, दक्षिण गोवा येथील बुथप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
सुभाष देशमुख कार्यकर्ते मोजण्यात व्यस्त- सहकारमंत्री सुभाष देशमुख स्वत: सकाळी १० वाजण्यापूर्वीच दाखल झाले़ त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणाहून कार्यकर्त्यांच्या गाड्या दाखल होत होत्या़ कुठून किती कार्यकर्ते आलेत, याचा आढावा घेण्यासाठी एकेका तालुक्याचे नाव घेत त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना उभे करून त्यांची संख्या मोजताना सुभाष देशमुख दिसून आले़ प्रत्येक बुथप्रमुख भगवी टोपी घालून आल्याने मंगल कार्यालय परिसर भगवेमय झाले होते होते़