सोलापूर : कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशात ज्या व्यक्तीचा पहिला बळी गेला त्याच्या नातेवाईकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा. रोग वाढण्यास देशात केंद्राचे तर महाराष्ट्रात राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.
कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूरच्या दौºयावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना म्हणाले, चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराची माहिती सर्व जगाला झाली होती. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) याबाबत गंभीर इशारा दिला होता. असे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौºयावर आले होते. वास्तविक केंद्र सरकारने त्याच वेळेस बाहेरील लोकांना देशात प्रवेश बंदी करणे अपेक्षित होते; पण बाहेरील देशातून लोक भारतामध्ये आल्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग सुरू झाला. हळूहळू या रोगाचा संसर्ग वाढू लागला आणि तो आज संपूर्ण देशांमध्ये पसरला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सध्या लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे देशातील कारखाने, कंपन्या, उद्योग बंद पडले होते. लाखो लोकांच्या हाताचे काम थांबल्यामुळे बेरोजगारीची वेळ निर्माण झाली आहे. आज सर्वसामान्य माणसाला स्वत:चे पोट कसे भरावे हा प्रश्न पडला आहे. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? सध्या ३० जूनपर्यंत लॉकडाऊन आहे; मात्र त्यानंतर तो संपेल असे नाही. कदाचित आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांनी शासनाच्या भरवशावर न राहता आतापासूनच कामाला लागावे असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी लोकांना स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, टीबी सारख्या आजाराप्रमाणे कोरोनासोबत जगण्याचा सल्ला यावेळी दिला.
लॉकडाऊनमुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न दोन्ही सरकार सध्या करीत आहेत असा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, बबन शिंदे, समिउल्ला शेख आदी उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल दरवाढीने तिजोरी भरण्याचा प्रयत्नसध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव घसरले आहेत असे सांगितले असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकार तिजोरी भरण्याचा प्रयत्न करीत आहे. शासन सध्या सर्वसामान्य जनतेला ब्लॅकमेल करत आहे.
लॉकडाऊन का ? गेल्यावर्षी २०१९ मध्ये मार्च ते जून दरम्यान २४ लाख ४ हजार टीबीचे पेशंट होते. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाला नाही; मात्र त्यापेक्षा कोरोनाबाधितांची संख्या कमी असताना लॉकडाऊन करणे योग्य राहणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.