सोलापूर : बनावट नोटा देऊन आसरा चौकात भाजीपाला खरेदी करणाºया कुमठ्याच्या संजय पवारचे गैरकृत्य अखेर त्या भाजीवाल्यानेच उघडकीस आणले. पहिल्यांदा फसला गेल्यानंतर पवार जेव्हा अशाच नोटा घेऊन भाजी घेण्यासाठी आला तेव्हा भाजीवाल्याने याच माणसाकडील नोटा नकली असल्याचे ओळखले अन् त्याने पवारसमोरच नोटा फाडून पोलिसांना खबर दिली. विजापूर नाका ठाण्याच्या पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून पवारला जेरबंद केले अन् सोलापुरातील बनावट नोटा तयार करण्याचा अड्डा उघडकीस आला.
पवारसह विष्णू सिद्राम गायधनकर याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे पैशाची चणचण भासू लागल्याने आरोपी विष्णू सिद्राम गायधनकर (वय ३५, रा. भारत हौसिंग सोसायटी,मौलाली चौक) याला घर बांधण्यासाठी पैशाची गरज होती. यासाठी यू-ट्यूबवरून त्याने बनावट नोटा छापण्याच्या तंत्राचे प्रशिक्षण घेतले. छापलेल्या नोटा बाजारात वितरित करण्यासाठी आरोपी संजय पवार याला आपल्या साथीला जोडले. पोलिसांनी पवार याला पकडल्यानंतर त्याने आरोपी गायधनकर याचे नाव सांगितले. तेव्हा पोलिसांनी गायधनकर याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरातून कलर प्रिंटर, शाईच्या बाटल्या, पेपर कटर व शंभर रुपयांच्या ६१० नोटा, पाचशे रुपयांच्या १०० बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, पोलीस हवालदार राजकुमार तोळनुरे, नरोटे, श्रीरंग खांडेकर, आलम बिराजदार, लक्ष्मण वसेकर, बालाजी जाधव, इम्रान जमादार, उदयसिंह साळुंखे, पिंटू जाधव, विशाल बोराडे, लखन माळी यांनी केली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कोल्हाळ करीत आहेत.