सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली जनादेश यात्रा २५ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांच्या भाजप प्रवेशाची तयारी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सुरू केली आहे. पालकमंत्री देशमुख यांच्याकडे यासंदर्भात विशेष बैठका सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा २४ आॅगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असेल. २४ आॅगस्ट रोजी रात्री तुळजापूर मार्गे ही यात्रा सोलापुरात दाखल होईल. २४ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम असेल. २५ आॅगस्ट रोजी ही यात्रा सोलापूर, कामती, माचणूर, मंगळवेढा, पंढरपूर, टेंभुर्णी असा प्रवास करीत इंदापूर तालुक्यात दाखल होणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यावर या यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी आहे.
या यात्रेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नेते भाजपत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. प्रवेशाचा मुहूर्त ठरविण्यासाठी पालकमंत्री देशमुख, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांची बैठक झाली.
जनादेश यात्रा पोहोचण्यापूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार म्हेत्रेंचा प्रवेश करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात्रेत इतर नेत्यांचे प्रवेश करुन घ्यायचे, असे ठरले. पालकमंत्री देशमुख यांनी अक्कलकोटसोबतच माढा आणि पंढरपूर तालुक्यातील उमेदवार निश्चितीबाबत माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून कानोसा घेतल्याची चर्चा आहे. या चर्चेचा वृत्तांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कानावर घालण्यात आला आहे.
शिवदारेंचा प्रवेश स्वतंत्रपणे- काँग्रेस नेते राजशेखर शिवदारे यांच्या भाजप प्रवेशाबाबत नुकतीच पालकमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. जनादेश यात्रेत किंवा यात्रेपूर्वी शिवदारेंचा प्रवेश होणार आहे. शहर उत्तर विधानसभा आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपला मदत करण्याचा शब्द शिवदारेंनी दिला आहे.