महेश कुलकर्णी
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत सोलापूरलोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या तिन्ही पक्षांचे समर्थक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत. काँग्रेसकडून ‘साहेब फिरसे’, भाजपाकडून ‘फक्त स्वामी’ आणि वंचित बहुजन आघाडीचे समर्थक ‘ओन्ली व्हीबीए’ असे म्हणून निवडणुकीआधीच आपल्या नेत्याचा विजय पक्का असल्याचे सांगत आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियाचा खुबीने वापर केला. त्यांच्या विजयात काहीअंशी वाटा सोशल मीडियाचा असल्याचे लक्षात आल्यानंतर इतर पक्षांनीही वेगळा सोशल मीडिया ‘सेल’ विकसित केला आहे. याद्वारे एकमेकांची खिल्ली उडविली जात आहे. ‘सेल’शिवाय सर्वच प्रत्येक पक्षाच्या समर्थकांनीही एकमेकांच्या विरोधातील पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काही जणांनी तर सोशल मीडियावर तिन्ही उमेदवारांपैकी कोण निवडून येणार, अशा आशयाचे पोल घेऊन मतदारांचा कौल जाणून घेतला आहे.
काँग्रेस समर्थक म्हणतात, पाच वर्षे भाजपाच्या विद्यमान खासदारांनी काहीच केले नाही म्हणून उमेदवार बदलला - हा भाजपाचा पहिला पराभव आहे, पाच वर्षे विकासाची वाट पाहिली, मात्र झाला चौकीदार’, अशा भाजपाची खिल्ली उडविणाºया पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. दुसरीकडे भाजपा समर्थकांनी ‘अब की बार जयसिद्धेश्वर महाराज’ अशा पोस्ट शेअर केल्या आहेत. याचबरोबर भाजपा समर्थकांकडून २५-३० वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेले कात्रण फिरत आहे. ‘लक्ष्मी-विष्णू बंद पडू देणार नाही- पवार’ असे आशयाचे हे कात्रण आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समर्थकांनीही सोशल मीडियावर जोरदार आघाडी उघडली आहे. काँग्रेस, राष्टÑवादी आणि भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित चळवळीचा कसा सोयीने वापर करून मते मिळविली, याच्या सुरस कथाही शेअर आणि फॉरवर्ड केल्या जात आहेत.
काँग्रेसमुक्त की काँग्रेसयुक्त ?
- - ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाºया भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या अनेक नेत्यांना प्रवेश देऊन बहुतांश जणांना उमेदवारीही दिली आहे. हा प्रकार म्हणजे हास्यास्पद असून, भारत काँग्रेसमुक्त करायला निघालेला भारतीय जनता पक्ष ‘काँग्रेसयुक्त’ झाला असल्याची पोस्ट सर्वत्र फिरत आहे.
विकासाचे मुद्देही चर्चेत...
- - विकासाच्या मुद्यावरही सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. काँग्रेस समर्थकांच्या मते पाच वर्षांत सोलापूरच्या विद्यमान खासदाराने काहीही केले नाही. दुसरीकडे शहरात स्मार्ट सिटीची कामे केली असून, सध्या अनियमित होणाºया पाणीपुरवठ्याला काँग्रेसचे अनेक वर्षे सत्तेत राहिलेले नेते जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.