४ जून रोजी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने व जेलमधील लाइट गेल्याने सर्व कैद्यांना लॉकअपमधून काढून व्हरांड्यात सोडले होते. त्यावेळी आनंदा तुकाराम होनमुर्गी (वय ३५, रा. मारोळी) याने अंधाराचा फायदा घेऊन संरक्षण भिंतीवरील तारेच्या कुंपणाला रबरी पाण्याचा पाइप अडकवला. त्याचा आधार घेत रात्री आठच्या सुमारास पळून जाण्यात यशस्वी झाला.
पाऊस कमी झाल्यानंतर आरोपी पूर्ववत जेलमध्ये पाठवताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी मोजले. एक आरोपी कमी असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना माहिती दिली. डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सहा पोलीस पथके तैनात करून तालुक्याच्या विविध भागांत पाठविली.
या पथकाला खोमनाळरोडवरील ताड कॉलेजसमोर रात्री १० वाजता संबंधीत कैदी चालत चालल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने त्यायच्यावर झडप घालून पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्याच्यावर मंगळवेढा पोलिसांत गुन्हा नोंदला आहे.
सबजेलचे ग्रहण केव्हा सुटणार?
मंगळवेढा सबजेलची इमारत जुनी असून, गळकी आहे. पावसात आरोपींना कुडकुडत बसावे लागते. जेलच्या आतमध्ये शौचालय सुविधा नसल्याने आरोपींना बाहेरच्या शौचालयात जावे लागते. तसेच जेलच्या वरील बाजूस मजबूत तटबंदी नसल्याने दोन वर्षांत आठ ते दहा कैदी पळून गेले आहेत. सध्या जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त असे ४४ कैदी आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार केला. अद्यापही कार्यवाही झालेली नाही. शुक्रवारच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन गंभीर झाले आहे.