सोलापूर : शिखर बँकेची चौकशी लावून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचा सूड घेतला आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बदला कुठं आला? असा सवाल माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्टÑवादी काँग्रेसला संपविण्यासाठी साखर संघ आणि शिखर बँकेवर पहिला घाव घातला. येथूनच शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले. पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. विश्वासातला अधिकारी बँकेवर प्रशासक नेमून राष्टÑवादीला उद्ध्वस्त करण्याचा आघात चव्हाण यांनी केल्याचा आरोप ढोबळे यांनी केला.
कोट्यवधीच्या कर्जांची प्रकरणे गोळा करून पवारांच्या विरोधकांना पुरविण्यात आली. जुने कारखाने मोडीत काढून नवे कारखाना विकत घेण्याचा प्रस्ताव अजित पवार यांचा होता, तो मोडीत निघाला. तरीही अजित पवार यांनी सपाटा सुरूच ठेवला. शिखर बँकेच्या चौकशीचा विषय जुना असून, बँकेची चौकशी आणि संचालकावर कारवाई याबाबत पृथ्वीराज चव्हाण आग्रही होते. परिणामी आघाडीची सत्ता गेली. सहकारातून आणि साखर संघातून मोकळे केल्याशिवाय काँग्रेसला सरळपणाचे राजकारण करता येणार नाही, असे त्यांचे मत होते.
काँग्रेसमधील कराड, नगर आणि नांदेडचेही अनुमोदन मिळाल्यानंतर पुराव्यानिशी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या सर्व राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन घोटाळ्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. बँक घोटाळा प्रकरण हायकोर्टाने लावून धरल्याने आणि सुप्रीम कोर्टाची भूमिका स्पष्ट असल्याने तसेच शंभर कोटींच्यावरील प्रकरणे ईडीकडे असतात हे माहिती असल्याने याचा प्रवास वेगाने झाला. या सर्व चढउतारात देवेंद्र फडणवीस यांचा संबंध कुठे येतो असा सवाल ढोबळे यांनी केला.
आत्मचिंतन करा- शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीच एकत्र येऊन कोण कुठे आडवे आले याचा शोध घ्यावा. काँग्रेस संस्कृतीत जे पेरले तेच आज उगवले आहे. आपल्याला ते त्रासदायक ठरले याचा तपास या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा आणि आत्मचिंतन करावे असेही ढोबळे यांनी म्हटले आहे.