सोलापूर : जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि हातपंपांच्या दुरूस्तीची गरज लक्षात घेता जिल्ह्यातील हातपंपांच्या दुरूस्तीसाठी कंत्राटी स्वरूपात खासगी कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या बैठकीला महिला व बालकल्याण सभापती, अर्थ सभापती, आरोग्य सभापती, गटनेते आनंद तानवडे, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत मंत्री भाऊसाहेब फुंडकर, राजन पाटील यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषद सदस्य दाहिंजे यांच्या बंधूचे निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रारंभी मागील इतिवृत्तावर चर्चा झाल्यावर आयत्या वेळी आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. २०१७-१८ या वर्षातील वैयक्तिक लाभ योजनेचा अखर्चित निधी चालू वर्षात खर्च करण्याची परवानगी देण्यात आली. दलित वस्तीचा निधी परत जाऊ नये, यासाठी काटेकोरपणे कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या. सोलापुरातील नेहरू वसतिगृहातील प्रवेश शुल्क साडेतीन हजार रुपयांवरून तीन हजार रूपये करण्याचा ठराव घेण्यात आला. पंचायत समित्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पंढरपूर तालुक्यातील चळे येथील आठवडा बाजाराला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.