सोलापूर : सहकारी संघांचा अनुदानावर दूध खरेदी करण्याचा निर्णय झाला असतानाच खासगी संघही प्रति लीटरला दोन रुपयाची दरवाढ करणार आहेत. एक सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असल्याने दूध उत्पादकासाठी सप्टेंबर फायदेशीर ठरणार आहे.कोरोनामुळे संपूर्ण हॉटेल व्यवसाय बंद पडला; शिवाय मुंबई, पुणे व अन्य शहरातून लोक गावाकडे परतल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यामुळे गाईच्या दुधाचे दर हे प्रति लीटर १७-१८ रुपयांवर आले आहेत. सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रति लीटरला २५ रुपये दर द्यायचा आहे. सहकारी दूध अनुदानावर खरेदी सुरू होणार असताना खासगी दूध संघही प्रति लीटरला दोन रुपयाची वाढ करणार आहेत. एक सप्टेंबरपासून गाईचे दूध २० रुपयाने खरेदी करण्यात येईल असे सोनाई दूध संघांच्या दशरथ माने यांनी सांगितले.