माळशिरस : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनाबाबत प्रोत्साहन देत गौरव केल्याने त्यांची इच्छाशक्ती, मनोबल, धैर्य वाढवणे, नवनवीन तंत्रज्ञान वापरून कृषी उत्पादनात वाढ करणे, या उद्देशाने कृषी विभागाने २०२० मध्ये रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या पीक उत्पादनात पहिल्या तीन क्रमांकासाठी २ ते ५ हजारांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे यांनी दिली.
कृषी विभागाने मराठी सर्वसाधारण गट व आदिवासी गट यामध्ये तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर पीक स्पर्धा आयोजित केली आहे. शेतकऱ्यांना एकाच वर्षात पिकाच्या उत्पादकतेवर पहिल्या तीन क्रमांकासाठी २ ते ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३०० रुपयांच्या फीचे चलन ३१ डिसेंबरपर्यत जमा करावे लागणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे यांनी केले आहे.