सोलापूर : घरी एखादा सण असल्यावर जसा उत्साह असतो.अगदी त्याच प्रकारचा उत्साह गाढव पाळणाºयांच्या घरात दिसत होता. रंगाने नटवलेले गाढव त्यांना फुलांच्या आणि मण्याच्या माळा घातल्या होत्या. निमित्त होते ते म्हणजे गाढवांचा पोळा किंवा कारहुणवी. दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी गाढवांना काम न लावता त्यांना सजवण्यात येते. त्यांना पुरण पोळीचा नैवेद्यही दिला जातो.
रविवारी सकाळी संभाजी तलाव येथे सुमारे ४० ते ५० गाढवांना आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर त्यांना रंगवण्यात आले. रंगवलेल्या गाढवांना घुंगरु, माळा घालण्यात आल्या. गाढवं सुंदर दिसावीत यासाठी त्यांना कल्पकतेने रंगवण्याकडे त्यांचा कल होता. गाढवांना रंगवण्यासाठी मधला मारुती परिसरातून रंग आणण्यात आला. संभाजी तलावात गाढवांना न्हाऊ घातल्यानंतर रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले. वेगवेगळे नक्षीकाम तसेच गाजलेल्या चित्रपटांची नावे गाढवाच्या अंगावर लिहिण्यात आली होती. इतकेच नव्हे तर सजवलेल्या गाढवासोबत सेल्फी काढण्यातही ते गुंग होते.
पावसामुळे काम नाही !- वटपौर्णिमेला गाढवांचा पोळा साजरा करण्यात येतो. यानंतर पावसाला सुरुवात होते. त्यामुळे बांधकाम किंवा वीट भट्टीवरील काम नसते. यामुळे गाढवांना आराम मिळतो. या चार महिन्यात गाढवांना काम नसल्याने त्यांना मोकळे सोडण्यात येते. रात्रीच गाढवांचा शोध घेऊन त्यांना घरी आले जाते व पुन्हा सकाळी सोडले जाते.
गाढवांना पुरणपोळी तर कामगारांना कपडे- गाढवांना सजवल्यानंतर सायंकाळी त्यांना हार घातला जातो. गाढवांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. तसेच भात, आमटी, वांग्याची भाजी, पापड, भजी आदी पदार्थही तयार केले जातात. यासोबतच गाढवाचे मालक हे त्यांच्या कामगारांना कपडेही देतात. यासाठीची तयारी आधीपासून करून टेलरकडे कामगारांच्या कपड्याचे माप दिले जाते. पोळ्याच्या दिवशी कामगार हे नवे कपडे घालतात.
दरवर्षी वटपौर्णिमेला आम्ही गाढवांचा पोळा किंवा कारहुणवी साजरी करतो. या गाढवावरच आमचे कुटुंब जगते. या दिवशी गाढवाला आराम देऊन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. - मारुती कुमार
गाढवांचा पोळा हा आमच्यासाठी दिवाळीप्रमाणे मोठा सण असतो. या दिवशी घरी गोड जेवण करतो. सायंकाळी गाढवांची पूजा करून नैवेद्य देतो. फटाकेही उडवतो.- व्यंकटेश कुमार.
मिरवणुकीने उत्सवाचा समारोप...- बँजो, डॉल्बी सिस्टीम, ढोल, ताशा यांच्या तालावर गाढवांची मिरवणूक काढण्यात आली. सुमारे २५० तरु णांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणूक मार्गात फटाकेही उडवण्यात आले. लष्कर येथे सुरु झालेली मिरव़णूक मौलाली चौक, जगदंब चौक, जांबमुनी चौक,सरस्वती चौक मार्गे काढण्यात आली़ सिद्धार्थ चौक येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत चार संघ सहभागी झाले होते. यात हणमंतु कुमार, रवी गोन्याल, अजय म्हेत्रे, मारुती म्हेत्रे यांच्या संघाचा समावेश होता.
नाकावरुन ओळख- बहुतांश गाढवं दिसायला सारखीच असतात. यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते. यासाठी गाढवाच्या नाकाजवळ विशिष्ट प्रकारची खूण केली जाते. तसेच गाढवाला पळताना दम लागू नये यासाठी नाक विशिष्ट पद्धतीने कापतात. गाढवं हरवली तर नाकामुळे शोधणे सोपे जाते.