सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकू जगप्रसिद्ध आहे. केम येथे २२ कुंकूचे कारखाने आहेत. येथे कुंकू, गुलाल, बुक्का तयार केला जातो. देवदेवतांच्या यात्रा आणि उत्सवात कुंकू, गुलाल, बुक्का मोठ्या प्रमाणात वापरण्याची परंपरा हजारो वर्षांपासून आजही सुरू आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू होताच देवदेवतांच्या यात्रा, उत्सवावर बंदी घालण्यात आली. मंदिरे कुलूपबंद झाली. त्याचा परिणाम पंढरपूर, तुळजापूर, शिखर शिंगणापूर, येरमाळा, ज्योतिबा, खंडोबा व गावोगावच्या यात्रा होऊ शकलेल्या नाहीत.
महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, आसाम, दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील देवतांच्या उत्सवात गुलाल, बुक्का व कुंकू याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केम येथील कारखान्यातून सीझनमध्ये ८०० मे.टन गुलाल व कुंकू पाठवला जातो. दोन महिन्यांपासून कुंकूची कारखानदारी बंद आहे. कारखान्यात काम करणाऱ्या ४०० कामगारांचा रोजगार बुडाला आहे. या काळातही विजेचा स्थिर आकाराचा भुर्दंड या कारखानदारांना सहन करावा लागतोय. बँका, पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज आणि व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
.....................
कर्जावरील व्याज माफ करा
तब्बल दोन वर्षे होत आली. देशभरातील मंदिरे बंद आहेत. यात्रा, उत्सवावर बंदी घालण्यात आलीय. पंढरपूरची आषाढी वारी गेल्या दोन वर्षांपासून झालेली नाही. यामुळे कुंकू कारखानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. यातून सावरण्यासाठी कुंकू कारखानदारांना वीजबिल व दोन वर्षांचे विजेचे स्थिर आकार, कर्जावरील व्याज माफी करावी. -मनोज सोलापुरे, कुंकू कारखानदार, केम.