आप्पासाहेब पाटील, सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेने बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून सराफ व्यावसायिकांच्या दुकानांचे केलेल्या नुकसानीच्या विरोधात व कारवाईच्या निषेधार्थ सोलापुरातील पाचशे ते सहाशे सराफ व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून संप पुकारला आहे. या संपाला व्यापाऱ्यांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सराफ बाजारात बुधवारी सकाळपासून शुकशुकाट दिसून येत आहे.
दरम्यान, महापालिकेचा धिक्कार असो..महापालिकेचा धिक्कार असो अशा घोषणा सराफ व्यावसायिकांनी दिल्या. सकाळपासून सराफ दुकानातील सर्व दुकाने बंद असल्याने कोट्यावधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आकासापोटी, व्देषबुध्दीने कारवाई केल्याचा आरोप सराफ व्यावसायिकांनी केला आहे. मंगळवारी दिवसभर सराफ बाजारात अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या कारवाईवेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना धक्काबुक्की करीत धमकी दिली. शिवाय चर्चा करण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा करीत बेकायदेशीरपणे अतिक्रमणाची कारवाई करून सराफ व्यावसायिकांचे लाखोचे नुकसान केल्याचा आरोप सराफ व्यावसायिकांचा आहे.
वनवे चा भाग आहे. रहदारीला अडचण येत नाही. अतिक्रमण कशा पध्दतीने केले हेच समजायला तयार नाही. नोटीस, पूर्वसुचना दिली असती तर आम्ही सहकार्य केलं असतं. तुला बघून घेतो, कारवाई घेताे अशी धमकीच्या भाषा वापरून महापालिकेच्या अधिकारी कारवाई करीत असतील तर हे चुकीचे असल्याचे मत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष देवरमनी यांनी व्यक्त केले.