सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला पर्यायी चिमणी उभारण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तीन जागा सुचविल्या आहेत. या जागा कारखान्याबाहेरील आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्या खूपच गैरसोयीच्या असल्याने कारखाना प्रशासनाला मान्य होणार नाहीत. त्यामुळे यासंदर्भातील अहवाल आता शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
होटगी रस्त्यावरील विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचा अहवाल विमानतळ प्राधिकरणाने दिला आहे. कारखाना प्रशासनाने चिमणी हटविण्याची तयारी दर्शविली आहे. पर्यायी चिमणी उभारण्यास जागा सुचविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी ६ जून रोजी कारखानास्थळावर जाऊन पाहणी केली. प्राधिकरणाचे सहसरव्यवस्थापक गिरीश श्रीवास्तव, रणजितकुमार चंदा, विमानतळ विकास कंपनीचे संतोष कौलगी यांच्यासह कारखान्याचे तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.
प्राधिकरणाने दिलेला अहवाल मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर आला. डॉ. भोसले म्हणाले, पाहणीपूर्व बैठकीत प्राधिकरणाने कारखाना प्रशासनाला तीन जागा सुचविल्या. त्या कारखान्याला अमान्य आहेत. पाहणीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. एनटीपीसीच्या चिमणीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
सात दिवस लिपिकाकडे राहिला अहवालच्भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी ७ जून रोजी आपला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडे सादर केला. मुळातच चिमणीचा विषय महत्त्वाचा असल्याने हा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाºयांकडेच आणून द्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते. मात्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकांनी एका कर्मचाºयामार्फत ७ जून रोजी तो जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडे पोहोच केला.
सामान्य शाखेतील लिपिकांनाही या अहवालाचे महत्त्व लक्षात आले नाही. त्यामुळे तो सामान्य शाखेतच राहिला. विशेष म्हणजे या अहवालाच्या प्राप्तीची नोंद मंगळवार, १२ जूनपर्यंत झालीच नसल्याचेही दिसून आले. पत्रकारांनी सायंकाळी विचारपूस केल्यानंतर लिपिकांनी शोधमोहीम सुरू केली.
विषय पुन्हा प्रलंबित राहणारच्उडान योजनेच्या माध्यमातून शासन सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीमुळे ही सेवा सुरू होऊ शकत नसल्याचे विमानतळ विकास कंपनीचे म्हणणे आहे. विमानतळ प्राधिकरणाने कारखान्यापासून दोन किमी अंतरावर चिमणी उभारावी, असे सुचविले आहे. आता शासन आणि कारखाना प्रशासनावर यावर काय निर्णय घेते याकडेही लक्ष असणार आहे. निर्णय होईपर्यंत विमानसेवेचा विषय प्रलंबित राहणार आहे.
कर्मचाºयांना काही देणे-घेणे नाहीसोलापुरात विमानसेवा सुरू व्हावी आणि सिद्धेश्वरच्या चिमणीचा विषय मार्गी लागावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ते नियमितपणे विमानतळ विकास कंपनी, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. जिल्हाधिकाºयांच्या पुढाकारामुळे प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी सोलापुरात येऊन पाहणी केली. अहवालही सादर केला, परंतु तो विमानतळ विकास कंपनीचे सोलापुरातील अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकांच्या अनास्थेमुळे जिल्हाधिकाºयांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला.