सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नती अखेर सेवानिवृत्तीच्या दिवशी झाली. हवालदाराला सहायक फौजदार म्हणून बढती देण्यात आली, मात्र ड्युटीचा शेवटचा दिवस होता अन् चंद्रकांत सिद्रामप्पा जक्कापूरे हे सेवानिवृत्त झाले. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी शेवटच्या दिवशी अनोखी भेट दिली.
गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यासह जवळपास २२ हवालदार पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. २२ जणांनी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांना भेटून माहिती दिली आणि अडचणी मांडल्या होत्या. डॉ. दीपाली धाटे यांनी तत्काळ सर्व कर्मचाऱ्यांची सर्व माहिती क्लर्ककडून मागवून घेतली. ज्यांना शक्य आहे अशा पोलीस हवालदार चंद्रकांत जक्कापुरे यांच्यासह सहा जणांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पोलीस आयुक्त हरिष बैजल यांच्याकडे दिला. त्यांनी अवघ्या काही तासांतच तो मंजूर केला.
सेवानिवृत्त होणारे चंद्रकांत जक्कापूरे हे हवालदार म्हणून नव्हे तर सहायक फौजदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या वर्दीवर एक स्टार लावून चंद्रकांत जक्कापूरे यांना पदोन्नती देवून गौरव केला. त्याचबरोबर सध्या कार्यरत असलेले पोलीस हवालदार विजय रामचंद्र झाकणे, गोवर्धन घगनसिंग परदेशी, रफिक इब्राहीम मुल्ला, नईम अख्तर कडेचुर, विलास सुभाष पवार यांनाही पदोन्नती देवून सहायक फौजदार करण्यात आले.
पदोन्नती मिळाली सेवा संपली : जकापूरे
० ३१ वर्षाच्या कालावधीत पोलीस म्हणून काम करताना अनेक चांगले व वाईट अनुभव आले. कामावर निष्ठा अन् प्रामाणिकपणा सोडला नाही. पदोन्नती होईल असे वाटत नव्हते. मात्र शेवटच्या दिवशी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी अनोखी भेट दिली. पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होताना आनंदही होतोय अन दु:खही होत आहे, असे म्हणत सेवानिवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत जकापूरे यांनी आपल्या डोळ्यांतील आश्रूला वाट मोकळी करून दिली.