सोलापूर : महापालिकेचा गेल्या दोन वर्षांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी डीएसके मोटर्सची केगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील इमारत सील करण्यात आली आहे.
डीएसके मोटर्सला प्रतिवर्षी तीन लाख ६८ हजार ६७० रुपयांचा मालमत्ता कर आकारला जातो. गेल्या दोन वर्षांपासून डीएसके मोटर्सने हा कर भरलेला नाही. महापालिकेने दंड आकारणी केली आहे. मनपाचे कर संकलन प्रमुख पी.व्ही. थडसरे म्हणाले, कर वसुलीसाठी डीएसके यांना दोनवेळा नोटीस बजावण्यात आली होती, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांचा एकही प्रतिनिधी भेटायला आलेला नाही. ही इमारत बंद अवस्थेत आहे.
शुक्रवारी सायंकाळी कर संकलन पथकाने ही इमारत सील केली. रविवार पेठेतील सरलाबाई सुमन लंकेश्वर यांच्याकडे तीन लाख २१ हजार ८७५ रुपयांची थकबाकी आहे. शुक्रवारी चार गाळे, एक कार्यालय आणि एक शोरुम सील करण्यात आले. मार्कंडेय शॉपिंग सेंटरमधील दोन गाळे धारकांकडे ६५ हजार आणि ७२ हजार रुपयांची थकबाकी आहे. हे गाळेही सील करण्यात आल्याचे कर संकलन प्रमुख थडसरे यांनी सांगितले. शनिवारी आणि रविवारी दिवसभर कारवाई सुरू राहणार आहे.
कर संकलन केंद्रे रविवारी सुरू राहणार - मिळकत कर ३१ मार्चपर्यंत भरल्यास नोटीस फी आणि वॉरंट फीमध्ये माफी तर शास्तीमध्ये ५० टक्क्यांची सूट मिळणार आहे. सर्वच कर संकलन केंद्रे सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी रविवार, ३१ मार्च रोजी मनपाची सर्व कर संकलन केंद्रे आणि गलिच्छ वस्ती सुधारणा विभागाचे संकलन केंद्र सुरू राहणार आहे.