सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर तलाव सुधारणेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत कंपनीचे अध्यक्ष असिम गुप्ता यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनाकडे सादर केलेल्या प्रकल्पातील सिद्धेश्वर तलाव सुधारणेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यापूर्वीही हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण हा परिसर भुईकोट किल्ल्याच्या क्षेत्रात येत असल्याने पुरातत्त्व विभागाने याला हरकत घेतली आहे. किल्ल्याच्या परिक्षेत्रात एका विटेचेही बांधकाम करता कामा नये, असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर तलावाच्या काठी जे सिव्हिल वर्क करण्यात येणार होते ते रद्द करण्यात आले आहे. अगदी सिमेंटचे बाकडे बसविण्याचे नियोजनही लक्ष्मी मार्केटसमोरील प्रवेशद्वाराकडे हलविण्यात आले आहे.
किल्ला परिक्षेत्रात येणाºया तलावाकाठी हिरवळ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये फुलझाडे व सावलीची मोठी झाडे लावण्याचा प्रस्ताव आहे. नैसर्गिकपणे जितका बदल करता येईल त्याप्रमाणे या परिसराला लूक देण्यात येणार आहे. यात दगडांचा पदपाथ, लॅन्डस्केपिंग, नागरिकांना बसण्यासाठी दगडांचे ओटे करण्यात येतील. फुलझाडांची वेगवेगळ्या आकारातील रांग, प्राणी व पक्ष्यांचे आकार देता येणारे वृक्ष अशी ही सजावट असणार आहे.