साेलापूर : रमाई आवास याेजनेसाठी शहरातून आलेल्या २४४७ प्रस्तांवामध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून हे प्रस्ताव तयार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाखल हाेतील, असे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.
रमाई आवास याेजनेतील प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी उपायुक्त एन. के. पाटील यांनी साेमवारी बैठक घेतली. यावेळी चंदनशिवे यांच्यासह समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, सहायक आयुक्त नानासाहेब महानवर, गवसुचे संताेष जगधनी, यूसीडी विभागाचे चंद्रकांत मुळे, गणेश काेळी, सिध्दाराम मेनकुदहे आदी उपस्थित हाेते. बैठकीबद्दल चंदनशिवे म्हणाले, रमाई आवास याेजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष निधी देण्याची तयारी दाखविली. समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकही हाेणार आहे. मात्र मनपाकडील प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत. महापालिकेला एकूण ३४४२ अर्ज प्राप्त झाले.
यातील ९५५ प्रस्तावांची कागदपत्रे पूर्ण आहेत. उर्वरित प्रस्तावांमध्ये कागदपत्रांची कमतरता आहे. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत झाला. या कामासाठी आमच्या भागातील सर्व नगरसेवक, कार्यकर्ते मदत करणार आहेत. हा प्रस्ताव तयार हाेताच तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविण्यात येईल.