सोलापूर : डाळिंब, ऊस, बोर यासारख्या पिकांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग निर्मिती शक्य आहे. हॅण्डलूम व पावरलूमच्या विकासासाठीही विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. यासाठी सोलापूर विद्यापीठात हॅण्डलूम व पावरलूम सबसेंटर सुरू करण्याकरिता प्रस्ताव दिल्यास त्यास मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.
शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागामार्फत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, उद्यमशीलता आणि विद्यापीठांची भूमिका या विषयावरील आयोजित आॅनलाइन राष्ट्रीय चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती, महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाकडून उद्योगवाढीसंदर्भात करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, रोजगार निर्मितीसाठी उद्योग क्षेत्र खूप खूप मोठे माध्यम आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या माध्यमातून समाजाचा व देशाचा चौफेर विकास होतो. उत्पादन व निर्यात वाढवून आत्मनिर्भर भारतासाठी देशातील युवकांनी योगदान द्यावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील उद्योगवाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून होत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. दूरदृष्टी ठेवून प्रत्यक्ष कृती करणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. ग्रामीण व शेती आधारित उद्योगांवर लक्ष केंद्रित करून त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील बलस्थानांचा अभ्यास करून प्रक्रिया आधारित उद्योगवाढीसाठी सोलापूर विद्यापीठाकडून प्रयत्न व्हावेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती देण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावे आणि विद्यापीठाकडून त्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केले.