सोलापूर : शासनाने शिक्षकांना ड्रेसकोड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही प्रसिध्द करण्यात आले आहे. मात्र शासनाने घाईगडबडीत शिक्षकांच्या संस्था, संघटनांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. शिक्षक पेहरावासंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय हा केवळ शासननिर्णयात वाढ करणारा असून आजही अनेक शाळांमध्ये ड्रेसकोड लागू असून असे निर्णय काढून शासन शिक्षकावर अविश्वास का दाखवत आहे असे म्हणत ड्रेसकोडला विरोध केला आहे. तो शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने सोलापुरात केली.
दरम्यान, संविधानानुसार कोणी कसा पेहराव घालावा याविषयी कोणतेही बंधन नाही, मग शासन असे निर्णय काढून शिक्षकावर का अविश्वास दाखवत आहे ? आरटीई नियम २०११ मध्ये शिक्षकाची कर्तव्य दिली आहेत, त्यातही कुठे पेहराव बाबत म्हटलेले नाही. तरी शासनाने हा शासननिर्णय रदद करावा अशी मागणी शिक्षक भारतीने या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड, उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार, कार्याध्यक्ष शशिकांत पाटील, कोषाध्यक्ष राजकुमार देवकते, शहराध्यक्ष देवदत्त मिटकरी, सचिव नितीन रुपनर, संघटक शरद पवार, मायप्पा हाके, तानाजी चंदनशिवे, इक्बाल बागमारू व इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.