सोलापूर : बहुचर्चित चेन्नई-सुरत हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश होऊनही शासनस्तरावरून बैठक लागत नाही, ही शोकांतिका आहे. परंतु शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्तेतील मंत्री अक्कलकोट येथे येत असून बाधितांसोबत त्यांचा संवाद होण्याकामी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घ्यावा. या मागण्यांसह अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर ग्रीनफिल्डच्या बाधित शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले.
अत्यल्प मोबदल्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. हायवेच्या निर्मितीमुळे इतर शेतकऱ्यांनाही अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व गोष्टी शासनस्तरावर बैठक लागल्यानंतर मिटू शकतात. परंतु ना बैठक, ना चर्चा, ना निर्णय यामुळे भविष्यात शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल असे तेथील शेतकऱ्यांचे मत आहे. योगायोगाने शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अक्कलकोटला येत आहेत.
म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी फडणवीसांशी संवाद साधून दिल्यास मार्ग निघू शकेल अशी भावना संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केली. यावेळी सचिव प्रियंका दोड्याळे, दीपक कदम, सुभाष शिंदे, चेतन जाधव, बिरु बन्ने, प्रकाश तेल्लुणगी, दत्तात्रय अस्वले यांच्यासह शेतकरी, महिला उपस्थित होते. या समयी नायब तहसीलदार विकास पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.