सोलापूर: युवा सेनेच प्रमुख आदित्य ठाकरे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी सोलापुरातील कार्यक्रमानंतर दुपारी सांगोल्यातील संगेवाडी गावातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी त्यांनी केली. याचवेळी राज्यातून बाहेर जाणाऱ्या उद्योगांवर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले.
"महाराष्ट्रात एवढं विचित्र वातावरण आहे, उद्योग राज्यातून पळून जातायत, शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, मंत्री बेताल वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे सांगोला येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सूर्यफुल पिकांची पाहणी करून उत्तम शिंदे, बाळासाहेब या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना ऑगस्ट महिन्यांपासून पिके पाण्यात गेली आहे. सरसकट पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत सरकारकडून मिळालेली नाही. ते सरकार फक्त राजकारण करण्यात गुंग आहे, यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही, वादग्रस्त विधाने करण्याबरोबरच महिलांबद्दल अपशब्द बोलण्यात राज्यातील मंत्री व्यस्त आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना उघड्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध त्यांनी व्यक्त केला.