सोलापूर : मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी महावितरण विभागातील उपकेंद्र सहायक भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाव्यात, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जुनी मिल कंपाउंड येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला ९ सप्टेंबर २०२० रोजी स्थगिती मिळाल्यानंतर ज्या उमेदवारांची निवडप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, त्यांना नियुक्त्या देण्याचे व त्याला संरक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. शासनाने कोरोनाकाळात ही प्रक्रिया पुढे ढकलली असल्याने उमेदवारांची नियुक्तीसुद्धा शासनाची जबाबदारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शासनाच्या या कृतीचा सकल मराठा समाजाने जाहीर निषेध केला.
हे आंदोलन सकल मराठाचे समन्वयक माउली पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब रोडगे, प्रियंका डोंगरे, ॲड. श्रीरंग काळे, संतोष गायकवाड, अश्विनी भोसले यांच्यासह मराठा समाजाचे विद्यार्थी, पदाधिकारी, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे ऊर्जा भवनाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.