यशवंत सादूल सोलापूर : आपल्या कार्यपद्धतीमुळे सोलापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे सर्वांच्याच चिरस्मरणात आहेत. दुर्दैवाने २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले. पण सोलापूरकरिता ते अनेक आठवणी ठेवून गेलेत. त्यांच्या नावावर अनेक सामाजिक व शैक्षणिक संंस्था-संघटना कार्यरत आहेत. अनेकांनी तर आपल्या वाहनावर ‘शहीद अशोक कामटे’ असे ठळकपणे लिहून आणि त्याखाली छायाचित्र लावलेले दिसून येते. एका चाहत्याने तर स्वत:चे आयुष्यच शहीद कामटे यांच्याशी जुळवून घेतले आहे. आपले राहणीमान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळतेजुळते ठेवत व स्वत:च्या नावासमोर ‘कामटे’ असा उल्लेख करणाºया या अवलिया व्यक्तिमत्त्वाचे नाव श्रीनिवास कामटे (यन्नम)!
सध्या ३५ वर्षे वय असलेल्या श्रीनिवासवर शहीद अशोक कामटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त प्रभाव आहे. आपल्या सामाजिक कार्यातून त्यांची सदैव आठवण करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या श्रीनिवासने प्रारंभी एका शाळेत शिपायाची नोकरी करीत बी.ए. पर्यंत शिक्षण घेतले. सध्या ते अर्थशास्त्र विषयात एम.ए. करीत आहेत. २००६ ते २००७ या काळात २२ महिने अशोक कामटे हे सोलापुरात पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा श्रीनिवास यांच्यावर जबरदस्त पगडा बसला होता. सामाजिक, राजक ीय, प्रशासकीय व्यवस्थेवरील प्रचंड चीड, समाजातील अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा याबद्दलची अस्वस्थता त्यांना सदैव भाग पाडत असे.
समाजकार्याचीही त्यांना आधीपासूनच आवड आहे. समाजप्रबोधनासाठी त्यांंनी शाळेतील नोकरी सोडून दिली व समाजकार्याला सुरुवात केली. कामटे यांचे अनुकरण करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. दहा वर्षांपासून शहीद कामटे यांच्यासारखेच डोक्यावर टक्कल ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली. स्वत:च्या दुचाकीवर आणि घरात सगळीकडे कामटे यांची छायाचित्रे लावली. एवढेच नाही तर स्वत:च्या नावापुढे कामटे असे लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. आता तर पूर्व भागातील लहान-थोर मंडळी त्यांना कामटे म्हणूनच संबोधतात. त्यांचे कुटुंबीयही त्यांना याच नावाने बोलावतात.
दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह झाला. पोलीस अथवा सैन्यदलात जाऊन कामटे यांच्याप्रमाणे देशासाठी सेवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजही त्यांचे कार्य सुरू आहे. वृक्षारोपण, स्मशानभूमी स्वच्छता अभियान, स्मशानभूमीतील कर्मचाºयांसोबत दिवाळी असे उपक्रम ते राबवित असतात. शहरातील जोडबसवण्णा चौक, डब्लूआयटी कॉलेज, आकाशवाणी रोड, विडी घरकूल आदी ठिकाणी त्यांचे वृक्षसंवर्धन व देखभालीचे काम सुरू असते. प्रत्येक ठिकाणी कामटे यांचे छायाचित्र लावूनच ते कार्य करीत असतात.
आयुष्यभर टक्कल राखण्याचा संकल्प...
- अशोक कामटे २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्यावर त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी श्रीनिवास कामटे (यन्नम) यांनी थेट पुणे गाठले. कामटेंचे निवासस्थान माहीत नसल्याने पोलिसांना विचारणा करीत निघाले असताना राज्यपाल व काही व्हीआयपींचा ताफा याच वाटेवरून चालला होता. श्रीनिवास यांचा पेहराव पाहून पोलिसांना संशय आल्याने पकडून चौकशी केली.
जवळ कोणतेही ओळखपत्र नसल्याने तासभर थांबवून ठेवले. पुणे पोलिसांनी सोलापुरातील काही पत्रकारांशी संपर्क साधून खात्री पटविल्यावरच सुटका केली. सुटका होताच त्यांनी अखेर कामटे यांचे घर गाठले. नेमके त्याचवेळी अण्णा हजारे अंत्यदर्शनासाठी आले होते. श्रीनिवास त्यांच्यासोबतच आल्याचे वाटून सुरक्षा रक्षकांनी आत प्रवेश दिला. अखेर शहीद कामटे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. याचवेळी आयुष्यभर स्वत:च्या डोक्यावर शहीद कामटे यांच्यासारखेच टक्कल राखण्याचा संकल्प श्रीनिवास यन्नम (कामटे) यांनी केला.