माळशिरस : जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची सन २०२२ ची नवीन यादी अमेरिका येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने स्कॉपस डेटाबेसच्या आधारे जाहीर केली आहे. तसेच ए.डी. सायंटिफिक इंडेक्स या संस्थेने तयार केलेल्या जागतिक दर्जाच्या नामांकित शास्त्रज्ञांची नवीन यादी जाहीर केली आहे. या दोन्ही यादीमध्ये मुळगाव सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील डॉ. रणजीत गजानन गुरव यांनी स्थान प्राप्त केले आहे.
चीन येथील नामांकित अशा नानकाई विद्यापीठ येथून एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंग या विषयामधून पोस्ट डॉक्टरेट केली. याशिवाय त्यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत देण्यात येणारा तरुण शास्त्रज्ञ म्हणून संशोधन प्रकल्पही मिळाला आहे.
डॉ. गुरव बायोटेक रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया तसेच असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांनी दक्षिण कोरिया येथील काँकुक विद्यापीठ येथे बायोलॉजिकल इंजिनीअरिंग विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणूनही काम केले.
बायोप्लास्टिक उत्पादन व विघटनवर संशोधनडॉ. रणजित गुरव यांनी सूक्ष्मजीव इंधन व वीजनिर्मिती, बायोप्लास्टिक उत्पादन व विघटन, बायोकेमिकल उत्पादन, बायोचार, आण्विक जीवशास्त्र, अँटिबायोटिक प्रतिकार, सांडपाणी प्रक्रिया, पोल्ट्री कॅरेटिन विघटन व जैविक खतनिर्मिती इत्यादी विषयांमध्ये संशोधन केले आहे. त्यांनी आजपर्यंत १०० हून अधिक जागतिक दर्जाचे संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहेत. तसेच दोन पेटंटही त्यांच्या नावे आहेत.
कामगिरीच्या आधारे मिळवले स्थानडॉ. गुरव हे सध्या अमेरिका येथील टेक्सास स्टेट विद्यापीठ येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जैवतंत्रज्ञान, पर्यावरण शास्त्र व सक्षम आणि धोरणात्मक तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील आपल्या कामगिरीच्या आधारे स्थान मिळवले आहे. डॉ. गुरव हे मूळचे सदाशिवनगर येथील एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी आपली एम.एस.सी. व पीएच.डी. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील जैवतंत्रज्ञान विभागातून केली आहे.