- विठ्ठल खेळगीसोलापूर - उजनी व वीर धरणातून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. महापुरामुळे नदीकाठावरील गावांमधील ज्या लोकांची घरे पुरामुळे बाधित होण्याची शक्यता अशा कुटूबांचे तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. संबंधित गावातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, धर्मशाळा, समाज मंदिरे आदी सुरक्षित ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या आहेत.पंढरपूर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, भीमा पाटबंधारे विभागाचे एस. एन. चौगुले यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील नदीकाठच्या गावांना संभाव्य पुरामुळे कोणताही धोका पोहचणार नाही तसेच जीवित व वित्तहानी होणार नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य नियोजन करावे. तसेच नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहून नदी तीरावरील त्यांची जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलवावी. जेणेकरून कुठलीही जिवीत व वित्त हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही गुरव यांनी केल्या.